
राज्यातच नाही तर देशभरात रस्त्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक रस्त्यावर इतके खड्डे आहेत की प्रवाशांचे कंबरडे मोडले जाते. मात्र अशाच एका खड्ड्यात केंद्रीय मंत्र्याची गाडी फसली. बहरगोरा येथे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची गाडी चिखलाने भरलेल्या खड्ड्यात अडकली.
चौहान हे या परिसरात प्रचारसभेसाठी आले असताना ही घटना घडली. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते, त्यामुळे रस्त्यात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचा चालकाला अंदाज आला नाही. त्यापैकी एका खड्ड्यात त्यांची कार अडकली. कार इतकी झुकली होती की त्यामधून चौहान यांना बाहेर काढण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
चौहान यांची गाडी खड्ड्यात फसल्याचे दिसताच स्थानिक अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी त्वरीत मदत करण्यासाठी पोहोचले, त्यांनी चौहान यांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि नंतर गाडी बाहेर काढली.