मिनी महाबळेश्वर दापोलीवर पसरली धुक्यांची चादर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारे मिनी महाबळेश्वर म्हणजेच दापोलीत गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. मात्र सोमवारी सकाळी दापोली शहरवासीयांना दाट धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पसरलेल्या या दाट धुक्याचा मनमुराद आनंद घेता आला. दापोलीत धुके पडू लागल्याने अखेर हिवाळा सुरू झाल्याची चाहूल लागली आहे.

दापोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून दररोज सांयकाळी पाऊस पडत आहे. सकाळी व दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस अशा सततच्या वातावरणातील बदलामुळे विविध प्रकारच्या साथीच्या संसर्गाने आधीच नागरिक हैराण झालेले आहेत. असे असताना सोमवारी मात्र सकाळ सकाळीच घराबाहेर पडलेल्यांना पसरलेल्या दाट धुक्याच्या सुखद आनंदाचे एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले.

दापोली शहरात पडलेले धुके इतके दाट होते की सकाळच्या वेळेत काही विशिष्ट अंतरावरील दृश्य अगदीच पुसट दिसत होते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण होऊन बसले होते. त्यामुळे दापोली शहरातून मार्गस्थ होणाऱ्या तसेच दापोलीत आलेल्या लोकांना आपल्या वाहनांचे दिवे लावूनच रस्ता पार करावा लागत होता.