शेअर बाजारात अदानींचं धाबं दणाणलं; अमेरिकेतील अटक वॉरंटचे पडसाद उमटले, 2 लाख कोटी गमावले!

उद्योगपती गौतम अदानी यांना एकामागून एक धक्के बसत आहेत. लाच आणि फसवणुकीचा आरोप प्रकरणात न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अटक वॉरंट जारी केल्यानंतर आता अदानींना दुसरा धक्का बसला आहे. न्यूयॉर्कमधील कोर्टाने अदानींना जारी केलेल्या अटक वॉरंटचे पडसाद शेअर बाजारातही उमटले. शेअर बाजारात अदानींचे शेअर 20 टक्क्यांनी घसरले.

शेअर बाजार सुरू होताच अदानी समूहाचे सर्वच शेअर एक करत दणादण आपटले. अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स सर्वाधिक कोसळले. हे शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत घसरले. यासह अदानी पॉवर (13.75 टक्के), अदानी पोर्ट्स (10 टक्के ), अदानी विल्मर (9.51 टक्के), अदानी एन्टरप्राईजेस (10 टक्के), अदानी टोटल गॅस (14.70 टक्के), एसीसी लिमिटेड (14.35 टक्के), अम्बुजा सिमेंट (10 टक्के), आणि एनडीटीव्हीचा शेअर 12.19 टक्क्यांनी आपटला.

Gautam Adani – गौतम अदानींवर अमेरिकेमध्ये लाच आणि फसवणूक प्रकरणी आरोप; अटक वॉरंट जारी

अदानी समूहाच्या प्रमुख तीन शेअरमध्ये 20 टक्के घसरण झाली. यामुळे अदानी समूहाच्या 11 शेअरना मोठा फटका बसला. परिणामी अदानी समूहाचे एकूण बाजार मूल्य अंदाजे 2 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 12.3 लाख कोटी रुपये झाले. 2023 च्या सुरुवातीला हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला बसलेला हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे.

काय आहे प्रकरण?

गौतम अदानी यांच्यासह 7 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाचखोरीचा आरोप आहे. अदानी यांनी हिंदुस्थानात सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देऊ केली होती, असे युनायटेड स्टेट्स ॲटर्नी कार्यालयाने म्हटले आहे. या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांचा भाचा सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टाने अटक वॉरंटही जरी केले आहे. रॉयटर्स ने हे वृत्त दिले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.