
अँटिलिया स्फोटके प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने यापूर्वी अटक बेकायदा असल्याचा दावा करीत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत अंतरिम जामिनावर तुरुंगातून सुटका करा, अशी विनंती वाझेने केली आहे. त्याच्या वतीने अॅड. रौनक नाईक यांनी अर्ज केला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर जिलेटीनच्या कांडय़ा व इतर स्फोटके तसेच धमकीचे पत्र असलेली गाडी बेवारस स्थितीत आढळली होती. याप्रकरणी वाझेसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) 13 मार्च 2021 रोजी वाझेला अटक केली. तेव्हापासून तो तळोजा तुरुंगात आहे. त्याच्या अंतरीम जामीन अर्जावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे 15 जानेवारीला सुनावणी होणार आहे.