
बायकोला दारूचे व्यसन असल्याचे सांगत घटस्फोट मागणारा नवरा उच्च न्यायालयात तोंडावर आपटला. बायकोला दारू पिण्याची सवय असणे ही क्रूरता नाही. बायको दारूच्या नशेत जोपर्यंत नवऱ्याला त्रास वा त्याच्याशी गैरवर्तन करीत नाही तोपर्यंत तिच्या व्यसनाला क्रूरता म्हणताच येणार नाही, असे महत्त्वपूर्ण मत न्यायालयाने नोंदवले आणि नवऱ्याला ‘जोर का झटका’ दिला.
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक चौधरी आणि ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. बायकोने दारूच्या नशेत त्रास दिल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्याने दिलेला नाही. मात्र दोघे अनेक वर्षे वेगळे राहत असल्याने दुराव्याच्या आधारे न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली.
न्यायालय म्हणाले…
- क्रूरता व साथ सोडणे या गोष्टी वेगळ्या आहेत. बायको दारू पिते हे एक कृत्य क्रूरता ठरू शकत नाही.
- बायकोच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे जन्मलेल्या मुलाला कोणतीही शारीरिक कमजोरी किंवा जन्मलेले मूल पूर्णपणे तंदुरुस्त नाही, असे कुठेही सिद्ध झालेले नाही.
- नवरा-बायको लग्नानंतरच्या वर्षातच एकमेकांपासून वेगळे झाले. अनेक वर्षांच्या दुराव्यामुळे ते पुन्हा एकत्र नांदण्याची चिन्हे नाहीत. हा घटस्फोटाचा आधार ठरतो.































































