पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बच्या अफवेचा फोन 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बस्फोटाच्या अफवेचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. अमेरिकन दहशतवादी हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले. धमकीचा फोन प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. धमकी देणाऱ्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिका दौऱ्यावर असताना मंगळवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. फोन करणाऱ्याने मोदी हे अमेरिकेत जात आहेत. त्या विमानात बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीहीदेखील आपण माहिती दिली होती. अमेरिकेतील काही दहशतवादी हा हल्ला करणार असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले.

घातपात करणाऱ्या दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी सहा विमानांत घातपाती कारवाई केल्या आहेत. ते दहशतवादी मोदी यांच्या विमानातदेखील बॉम्बस्फोट करणार असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने फोन कट केला. ज्या नंबरवरून धमकीचा फोन आला होता, त्याच नंबरवरून आतापर्यंत अनेक वेळा मुंबई पोलिसांना धमकीचे फोन आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बॉम्बस्फोटाच्या अफवेच्या कॉलची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. घडल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. फोन करणाऱ्याची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे समजते.