अखेर सरकारची आंदोलक शेतकऱ्यांसोबत बैठक, डल्लेवाल यांची रुग्णवाहिकेतून हजेरी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वातील सरकारचे शिष्टमंडळ आणि शेतकऱयांच्या प्रतिनिधींमध्ये अखेर आज बैठक झाली. शेतकऱ्यांच्या 28 सदस्यीय शिष्टमंडळाने अडीच तासांहून अधिक वेळ चर्चा केली. 26 नोव्हेंबर 2024 पासून आमरण उपोषण करत असलेले शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल बैठकीसाठी रुग्णवाहिकेतून हजर झाले. कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थित पुढील आठवडय़ात 22 फेब्रुवारीला पुन्हा बैठक होणार आहे.

गेल्या वर्षभरापासून संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाचे आंदोलन सुरू आहे. पंजाब-हरियाणाच्या सीमेवर शंभू आणि खनौरी येथे गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱयांच्या आंदोलनाचे नेतृत्व या दोन्ही संघटना करत आहेत. खनौरी सीमेवर आंदोलन करत असलेल्या डल्लेवाल यांना बैठकीच्या ठिकाणी नेण्यासाठी तब्बल चार तास लागले, असे शेतकरी नेते काका सिंह कोत्रा म्हणाले.