अहिल्यानगरात भाजपमध्ये नाराजीचा स्फोट ! मुख्यमंत्र्यांचा कोल्हेंना आधार; विखेंचे खच्चीकरण सुरूच !

>> मिलिंद देखणे

भाजपचे केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या शिर्डी आणि कोपरगावच्या दौऱ्यानंतर अहिल्यानगरमध्ये भाजप जिल्हा संघटनेत असंतोषाची लाट उसळली आहे. स्थानिक नेत्यांना डावलून घेतलेल्या या कार्यक्रमामुळे भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळाले नाही. त्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही आमचे अस्तित्व दाखवून देऊ,’ असा इशारा देत, ‘भाजप पक्ष आता काहींच्या मर्जीवर चालतो का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, कोपरगाव येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक कोल्हे यांचे पुनर्वसन करणार असल्याची जाहीर घोषणा करून नाराजीला अधिकच खतपाणी घातले. दुसरीकडे, माजी खासदार सुजय विखे यांच्याबद्दल फडणवीस यांनी एक शब्दही उच्चारला नाही. ना पुनर्वसनाचा उल्लेख, ना आश्वासन, त्यामुळे ‘विखेंना शह देण्यासाठीच कोल्हे यांना बळ दिले गेले का?’ असा सवाल भाजपच्या गोटातून विचारला जात आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून कार्यक्रम उभारल्याने जनतेतही नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांच्य नुकसानीचे भयावह चित्र समोर आले असताना अशा लाखो-कोटींच्या कार्यक्रमांवर उधळपट्टी झाल्याचा आरोप आता भाजपवरच होत आहे. ‘ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी नाही तर काय?’ असा सवाल भाजपच्या अंतर्गत गोटातच उमटतोय.

दरम्यान, कोल्हे यांच्या बाजूने झुकणारा सूर हा नवीन नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील बैठकीतच कोल्हेंना पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे काल शहांच्या उपस्थितीतच फडणवीसांनी त्या ‘शब्दावर’ शिक्कामोर्तब केले. मात्र, त्याच वेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात विखे यांचा विषय फडणवीसांनी जाणीवपूर्वक टाळल्याचे स्पष्ट झाले.

विखेंना बाजूला करून कोल्हेंना पुढे ढकलण्याची रणनीती सुरू आहे का? याबाबत काही कार्यकत्यांनी उघडपणे सांगितले की, ‘वरच्या पातळीवरूनच विखेंचे खच्चीकरण सुरू आहे.’ त्यातूनच नव्या गोटांची उभारणी सुरू झाली आहे. पक्षातील ही अंतर्गत कुरघोडी आता सरळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम करणार, हे असे स्पष्ट दिसते आहे.

आमचे अस्तित्व दाखवूनच देऊ !

अहिल्यानगर भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उघड होत असलेल्या फाटाफुटीमुळे आता पक्षनेतृत्व गोंधळलेले दिसत आहे. वरकरणी एकात्मतेचा दिखावा असला, तरी अंतर्गत संघर्ष उफाळून येत आहे. त्यातून नाराज असलेल्या निष्ठावंतांनी आगामी निवडणुकांमध्ये ‘आम्ही आमचे अस्तित्व दाखवूनच देऊ,’ असा इशारा दिल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.