
बीडमधील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महायुती सरकारवर विरोधकांचा प्रचंड दबाव आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आजच्या मंत्रीमंडळ बैठकीला दांडी मारली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांना पूर्णपणे अभय दिले आहे. पण तरीही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची प्री कॅबिनेट झाली. या बैठकीलाही धनंजय मुंडे उपस्थित राहिले नाहीत. मागील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाच्या वतीने जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारालाही धनंजय मुंडे गैरहजर होते.
राजीनामा घेतला की काय? – दमानिया
मंत्री धनंजय मुंडे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. त्यांचा राजीनामा घेतला की काय? घेतला असेल तर आनंदच आहे, असा टोला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजितदादांना लगावला आहे. धनंजय मुंडे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले. हा अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आज पण ते कॅबिनेटला अनुपस्थित असतील तर त्यांनी कुठे राजीनामा दिला आहे की काय? असा प्रश्न पडतो, असे दमानिया म्हणाल्या.