
लोकल ट्रेनच्या ऑनलाइन तिकीटचे पर्याय उपलब्ध झाल्यापासून बनावट तिकिटांचे प्रमाण वाढले आहे. अनेक प्रवासी तिकिटांसाठी बनावट क्यूआर कोड तयार करतात. हे प्रकार वारंवार उघडकीस आल्यानंतर पश्चिम रेल्वेने बनावट तिकिटे ओळखण्यासाठी विशेष ‘अॅप’ तयार केले आहे. तिकीट चेकिंग कर्मचारी या अॅपच्या माध्यमातून बनावट तिकीट ओळखू शकणार आहेत. यासाठी टीसींना विशेष प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
उपनगरी रेल्वेतील गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी बनावट क्यूआर कोड तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. लोकलना गर्दी फोटो असल्यामुळे टीसी प्रवाशांना यूटीएस अॅप उघडून तिकीट दाखवण्यास सांगत नाहीत. प्रवासी केवळ तिकिटाचा फोटो टीसीला दाखवतात. ते तिकीट बनावट आहे की खरे, हे लक्षात येत नाही. याचाच गैरफायदा अनेक प्रवाशांनी घेतल्याचे प्रकार उघडकीस आले. त्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने ऑनलाइन रेल्वे तिकीटची सत्यता पडताळण्यासाठी विशेष अॅप तयार केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील टीसींना हे अॅप त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करण्याची सूचना केली आहे. या अॅपमुळे ट्रेन तिकिटांच्या बनावटगिरीला आळा बसेल, असा विश्वास वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
लांब पल्ल्याच्या प्रवासात तक्रारींचा झटपट निपटारा
एक्प्रेसमधून लांब पल्ल्याचा प्रवास करताना गाडीतील अंतर्गत सुविधांबाबत प्रवाशांच्या काही तक्रारी असतात. अस्वच्छ टॉयलेट, पाणी गळती, खाद्यपदार्थ वा एसीमध्ये तांत्रिक बिघाड याबाबत सध्या प्रवाशांना ‘139’ हेल्पलाइन क्रमांक किंवा ‘रेल मदद’ अॅपवर तक्रार करावी लागते. या माध्यमातून संबंधित कर्मचारी वेळेवर येत नाहीत. आता नवीन अॅपमुळे प्रत्येक लांब पल्ल्याच्या तिकीट सुपरवायझरकडे संबंधित कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवासात कुठलीही गैरसोय झटपट दूर होणार आहे.