
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत मिंधेंच्या मंत्र्याचा खरपूस समाचार घेतला. उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून द्या, असे म्हणत आदित्य ठाकरे मिंध्यांचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
हे विधिमंडळ कायदेमंडळ आहे. विरोधी पक्षात असलो तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे-जिथे कायदे बनवायचे असीतल, चांगल्या काही सूचना द्यायच्या असतील तिथे-तिथे आम्ही सहकार्य करू. इथे अनेक मंत्री येतात. अभ्यास करून येतात. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तरं देतात. पण अध्यक्ष महोदय आपणास विनंती राहील की या विषयी आपण आपल्या दालनात बैठक बोलवावी. कारण मंत्र्यांचं प्रत्येक उत्तर हे केंद्र सरकारडे बोट दाखवणारं आहे. आपलं राज्य कृषि प्रधान आणि औद्योगिक राज्य आहे. आपल्याला बोट दाखवून चालणार नाही. यांना वाटत होतं बैठका घ्यायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही? हा मूळ विषय आहे. खात्याचा अभ्यास करून बोलावं. सत्ताधारी पक्षाचेही अनेक प्रश्न आहेत. आणि मंत्री त्यांना उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे अध्यक्षांना विनंती आहे, हे उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
रोहित पवार यांच्या प्रश्नावरून गुलाबराव पाटलांचा रंग उडाला!
केंद्रीय भूजल मंडळाने दिलेल्या माहितीनुसार वर्धा, बुलडाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण आहे. देशात दरवर्षी कर्करोगाचे 14 लाख रुग्ण आढळतात. आणि त्यातील दीड लाख रुग्ण हे महाराष्ट्रातील असतात. पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर त्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनातून समोर आलं आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात प्रत्येक 10 हजार कर्करोगाच्या रुग्णांमध्ये 100 म्हणजे 10 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. या विषयी काही प्रश्न हे सरकारला विचारले होते. पण प्रश्न जे केले आणि उत्तरं काहीतरी भलतेच आलेले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना घेरलं. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. तसेच शेतकऱ्यांकडून होणाऱ्या रासायनिक खतांच्या वापरावरला तुम्ही जबाबदार कसे काय ठरवू शकतात, असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. यानंतर काँग्रेस नेते आमदार नितीन राऊत यांनीही गुलाबराव पाटील यांनीही निशाणा साधला. रोहित पवार यांनी एका अत्यंत गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकारचं लक्ष वेधलं. परंतू राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर देत असताना मंत्र्यांनी सरसकट राज्य सरकारच्या धोरणावरच बोट ठेवलेलं आहे. धोरणावर सरकारच आक्षेप घेत असेल तर जनलेता न्याय कसा मिळणार? असा सवाल नितीन राऊत यांनी केला.