आधी 100 चा स्टॅम्प पेपर 500 रुपये केला, आता दस्त हाताळणी शुल्कही दुप्पट केले! शासन निर्णय शेअर करत रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

राज्यातील महायुती सरकार एका हाताने देऊन दुसऱ्या हाताने लुटण्याचा कारभार सध्या करीत आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारने 100, 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद करून 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुद्रांक शुल्कामध्येही भरमसाठ वाढ केली होती. आता दस्त हाताळणी शुल्कही दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्य सरकारने 15 एप्रिल 2025 रोजी एक शासन निर्णय जारी करत दस्त हाताळणी शुल्कामध्ये 20 रुपये वाढ करत असल्याचे जाहीर केले. यावरून रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टॅग केले आहे.

आधी 100 रु. चा स्टँप पेपर बंद करून 500 रु. चा केला. अर्थसंकल्पात मुद्रांक अभिनिर्णय (Adjudication) प्रक्रियेसाठी आकारण्यात येणारे शुल्क 100 वरून 1000 रुपये केले, आता दस्त हाताळणी शुल्क देखील प्रती पान 20 रुपयावरून दुप्पट करत 40 रु केले आहे. दलालांचे खिसे भरण्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसा काढला जात आहे. सामान्य जनतेला हे सरकार किती हातांनी लुटणार आहे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत टॅक्स वाढवला जात आहे, दुसरीकडं कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत, रुग्णवाहिकांमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नाहीत यावरून सरकार कंगाल झालंय, हे स्पष्ट आहे. राज्याच्या नेतृत्वाने आता राजकीय कुरघोड्या थांबवून दलाली आणि भ्रष्टाचाराला आळा घातला तरंच महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त होईल. मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यावर नक्कीच काम करतील, ही अपेक्षा, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.