
पाच वेळा आयपीएलच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणारा महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर पिंग्ज संघ यंदाच्या या टी-20 क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रथम प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा संघ ठरल्यात जमा आहे. ग्रेट फिनिशर म्हणून सर्वमान्य असलेल्या 43 वर्षीय धोनीची जादू यंदाच्या आयपीएलमध्ये चालली नाही. त्यामुळे ‘तू एक चॅम्पियन खेळाडू आहेस यात वादच नाही. मात्र, मित्रा, आता आगामी आयपीएलसाठी तुझी गरज उरलेली नाही. प्लिज आता बाजूला हो, असा प्रेमाचा सल्ला ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने आपला मित्र धोनीला दिलाय.
चेन्नई संघाने बलाढय़ मुंबईला हरवून आयपीएलची धडाकेबाज सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर घरच्या मैदानावर या संघाला सलग चार पराभव पत्करावे लागले. दरम्यान संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जायबंदी झाल्याने पुन्हा एकदा चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा धोनीच्या खांद्यावर आली. मात्र, त्याच्या नेतृत्वाची जादू काही चालताना दिसली नाही. स्वतः धोनीच कधी नवव्या, तर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. संघ अडचणीत असताना वरच्या क्रमांकावर येण्याचे धाडसही त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये केले नाही. त्यामुळे धोनीच्या फलंदाजी क्रमाकांवरूनही आता टीका सुरू झाली. त्यामुळे ‘अरे बाबा धोनी आता तू थांब,’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अॅडम गिलख्रिस्ट याने याबद्दल आपलं परखड मत व्यक्त केलंय. तो म्हणाला, ‘धोनी तू खरंच ग्रेट आहे. तुला सिद्ध करण्यासारखं असं काहीचं राहिलेलं नाही. कदाचित मला या सल्ल्याची पिंमत मोजावी लागेल. मात्र, धोनी आता पुढील आयपीएलसाठी तुझी गरज राहिलेली नाहीये. आय लव्ह यू धोनी… तू चॅम्पियन आहेस. एक आदर्श व्यक्तीही आहे, पण आता थांब.’ याचबरोबर अॅडम गिलख्रिस्टने चेन्नई सुपर पिंग्ज संघातील रवींद्र जाडेजा व रविचंद्रन अश्विन या खेळाडूंवर आणखी एक हंगाम विश्वास टाकायला हवा’, असेही म्हटले आहे.