
या कठीण प्रसंगी देशातील प्रत्येक नागरिकाने दहशतवादाशी लढण्यासाठी हात मिळवला आहे. अशा प्रकारची याचिका दाखल करून तुम्हाला सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करायचे आहे का, असा सवाल करत जबाबदार बना… अशा कठीण प्रसंगी संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकवटला असताना अशा याचिका आणू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पहलगाम हल्ल्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी करणारी याचिका करणाऱया वकिलांना फटकारले आणि याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती सूर्य कांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तुमचेही देशाप्रती काही कर्तव्य आहे. ही तुमची कुठली पद्धत आहे? कृपया असे करू नका. अशा याचिका आणू नका, असे सांगत याचिकाकर्ते फतेश कुमार साहू आणि इतरांना याचिका मागे घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. दहशतवादी हल्ल्यासारख्या मुद्दय़ाची संवेदनशीलता पाहा. सुरक्षा यंत्रणांचे मनोधैर्य कमजोर करणाऱया याचिका करू नका, असे न्यायालय म्हणाले. दरम्यान, सुनावणीनंतर याचिकाकर्त्या वकिलांनी न्यायालयाकडे याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली.
निवृत्त न्यायाधीश तज्ञ नाहीत
तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची विनंती करत आहात, परंतु हे न्यायमूर्ती काही तज्ञ नाहीत, असे न्यायालय याचिकाकर्त्यांना म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकार आणि जम्मू कश्मीर प्रशासनाने जम्मू-कश्मीरमध्ये येणाऱया पर्यटकांच्या सुरक्षेची खात्री द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत, अशी विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.