
तिघेजण सांबर प्राण्याचे शिंग विकण्याच्या प्रयत्नात होते. ते खरेदी करणाऱ्याच्या शोधात असतानाच वनरक्षकांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. तिघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील शिंग ताब्यात घेण्यात आले.
काही तस्कर सांबर प्राण्याचे शिंग विक्री करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरिवली येथील मुख्य प्रवेशद्वारावर येणार असल्याची खबर वन अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उपसंचालक रेवती कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सह. वनरक्षक सुधीर सोनवले, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल मनीष महाले, रवींद्र सोळुंखे व पथकाने तत्काळ त्या ठिकाणी सापळा रचून आतिश पुंचीकुर्वे (22), साहिल शेख (21) आणि हर्षल शेटे (22) अशा तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडे सापडलेले सांबराचे शिंग त्यांनी कुठून आणलं, ते किती किमतीत विकणार होते, याआधीदेखील त्यांनी अशाप्रकारे प्राण्यांच्या अवयवांची तस्करी केली आहे का, याचा वन अधिकारी तपास करत आहेत.