मुंबई पोलिसांना चौथ्यांदा जेतेपद

मुंबई पोलीस सिटी रायडर्स संघाने ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि एम.सी.सी. आयोजित दहाव्या मित्सुई शोजी टी-20 क्रिकेट लीग स्पर्धेत बलाढय़ शिवाजी पार्क वॉरियर्स संघावर चार धावांनी निसटता विजय मिळवत चौथ्यांदा या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला. शिवाजी पार्क वॉरियर्स संघाचा कर्णधार हार्दिक तामोरे याने नाणेफेक जिंकून मुंबई पोलिसांना प्रथम फलंदाजी दिली. सुनील पाटील (31) आणि आर्यराज निकम (80) यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना 57 धावांची सलामी दिली. आर्यराजने नंतर हर्ष आघाव (37) यांच्यासह चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागी तर सातव्या क्रमांकावर आलेल्या रोहित पोळ (नाबाद 27) यांच्यासह सहाव्या विकेटसाठी आणखी 54 धावांची भागी रचत आपल्या संघाला 20 षटकांत 6 बाद 221 धावांचे लक्ष्य उभारून दिले. आर्यराजने 50 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांसह 80 धावा केल्या. शिवाजी पार्क वॉरियर्ससाठी साईराज पाटील याने 41 धावांत 2 बळी मिळवले. भरवशाचे गोलंदाज मोहित अवस्थी (4 षटकांत 50 धावा) आणि रॉयस्टन डायस (4 षटकांत 56 धावा) चांगलेच महागडे ठरले.

या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स संघाने पॉवर प्लेच्या 6 षटकांत 67 धावा करून तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण या स्पर्धेत दोन शतके करणारा सुवेद पारकर (8) आणि हार्दिक तामोरे (21) मात्र तंबूत परतले. वरुण लवंडे (37) बाद झाल्यानंतर अग्नी चोप्रा (58) आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीसाठी आलेल्या सिद्धांत सिंग (52) यांनी पाचव्या विकेटसाठी तडाखेबाज 88 धावांची भागीदारी केल्याने 15व्या षटकाअखेर त्यांनी 5 बाद 183 अशी मजल मारून विजय दृष्टिपथात आणला होता. शेवटच्या पाच षटकांत 39 धावांची आवश्यकता असताना सिद्धांत बाद झाला. कर्णधार सुनील पाटीलने स्वतः गोलंदाजी घेतली आणि आपल्या पहिल्याच षटकात अंकोलेकर आणि देव पटेल यांना तंबूचा रास्ता दाखवला. नंतरच्या षटकात त्याने बहरात असलेल्या अग्नी चोप्राला बाद केले तर शेवटच्या षटकात कार्तिक मिश्राला बाद करून मुंबई पोलिसांचा विजय साकारला. सुनील पाटीलने 15 धावांत 4 बळी अशी मोलाची कामगिरी करून संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलला. योगेश पाटील आणि रोहित बेहरे यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.