महामार्गावर कोंडीमारा! मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर, तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा

मे महिना हा सुट्ट्यांचा ओळखला जातो. अनेकांची पावले कुटुंबकबिल्यासह गावाच्या दिशेने वळतात. मात्र महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान वाहनांची जणू ‘हॉलीडे कोंडी’ झाली होती. तब्बल आठ किलोमीटरच्या लांबच लांब रांगा आज लागल्या. त्यामुळे भरउन्हात प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला.

आज महाराष्ट्र दिनाची सुट्टी तसेच शनिवार, रविवारची संधी साधून सलग तीन ते चार दिवस मौजमजा करण्यासाठी बच्चे कंपनीला सोबत घेऊन चाकरमानी आपल्या वाहनाने निघाले खरे, पण खंडाळा घाटातच त्यांची कोंडी झाली. काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागली. वाहनांच्या रांगेने संपूर्ण घाट व्यापला होता. गाड्या जागीच थांबल्याने चाकरमानी हैराण झाले.

पर्यटकांचे नियोजन कोलमडले

पोलिसांना ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. मुंबईकडे जाणारी वाहने थांबवून पुण्यात जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या करण्यात आल्या होत्या. तरीदेखील वाहतूककोंडी झाल्याने पर्यटक आणि प्रवाशांचे नियोजनच कोलमडले.