
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले आणि ‘वेव्हज समिट’ला हजेरी लावून तेथूनच माघारी परतले. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा तसेच मुंबई मेट्रो-3च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करतील, अशी अपेक्षा होती, मात्र ‘वेव्हज समिट’मध्येच पंतप्रधानांचा अख्खा दिवस संपला आणि दोन्ही प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मुहूर्त टळला. त्यामुळे वेगवान प्रवासाचे स्वप्न पाहत असलेल्या जनतेचा मोठा अपेक्षाभंग झाला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मार्गी लागलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मुंबईतील आरे जेव्हीएलआर ते कुलाबा भूमिगत मेट्रोचा वांद्रे कुर्ला संकुल ते वरळी आचार्य अत्रे चौक हा टप्पा प्रवासी सेवेसाठी सज्ज आहे. हजारो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता होती. राज्य सरकारचा तसा मानस होता. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तयारीही केली होती.
प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी संपूर्ण दिवसभर ‘वेव्स समिट’मधून वेळ काढू शकले नाहीत. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांच्या उद्घाटनाचा मुहूर्त हुकला. आता राज्य सरकार नवा मुहूर्त कधीचा ठरवतेय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प केवळ उद्घाटनाच्या समारंभांना मुहूर्त मिळत नसल्याने जनतेच्या सेवेत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
भूमिगत मेट्रोच्या बीकेसी ते वरळी या मार्गावर धारावी, शीतला देवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक, वरळी, आचार्य अत्रे चौक ही स्थानके आहेत. हा टप्पा मार्चमध्ये खुला करू, असे आश्वासन सरकारने दिले होते, मात्र ती डेडलाइन उलटली.
इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम मार्च अखेरीसच पूर्ण झाले आहे. हे 90 मिनिटांचे अंतर अवघ्या 40 मिनिटांत कापता येईल. उद्घाटन न झाल्याने वाहनधारकांना धोकादायक प्रवास आणि कोंडीचा ताप सहन करावा लागत आहे.
वरळी ते मरीन ड्राइव्ह भूमिगत मार्गही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी मार्ग अर्थात कोस्टल रोड प्रकल्पातील वरळी ते मरीन ड्राइव्ह या 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचेही काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हा मार्ग सुरू केला जाईल, अशी चर्चा होती. मात्र याचाही मुहूर्त लांबणीवर पडल्याने मुंबईकरांची निराशा झाली आहे.