सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी महिनाभरात मिळणार, मुंबई अग्निशमन दल निवृत्त जवान संघाच्या पाठपुराव्याला यश

मुंबई अग्निशमन दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांना त्यांची सेवानिवृत्तीची संपूर्ण रक्कम आणि पेन्शन तातडीने द्यावी, नाहीतर महाराष्ट्र दिनी भायखळा मुख्यालयाबाहेर आत्मक्लेष आंदोलन करू, असा इशारा मुंबई अग्निशमन दल निवृत्त जवान संघाने दिला होता. आंदोलनाचा इशारा देताच नरमलेल्या अग्निशमन दलाच्यावतीने कायदेशीर अडचणी असलेल्या कर्मचाऱ्यांची देणी वगळता 115 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी या महिनाभरात दिली जातील तर इतर सर्व दावे तत्काळ निकाली काढण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले .

मुंबई अग्निशमन दलातून निवृत्त झालेल्या जवानांना निवृत्तीनंतरची रक्कम, पेन्शन आणि इतर लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळे निवृत्त जवानांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीतच निवृत्त अग्निशामक मोहन मोरे यांचे निधन झाले. मोरे यांच्या कुटुंबासह निवृत्त जवानांची रखडलेली देणी तत्काळ देऊन त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेनेचे सल्लागार निवृत्त प्रमुख अग्निशामक राजाराम धुरी आणि दामोदर पांडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अग्निशमन दल निवृत्त जवान संघ यांच्या माध्यमातून सर्व निवृत्त जवानांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारच्या संबंधित विभागांना केली होती. देणी दिली नाहीत तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी भायखळा अग्निशमन दल मुख्यालयासमोर आत्मक्लेष आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दल लढाऊ कामगार सेना संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी मुंबई अग्निशमन दलप्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांच्या कक्षात उपाध्यक्ष अनिल खराटे, चिटणीस मिलिंद वळंजू, अफझल कागदी, खजिनदार दशरथ घनवट, उपचिटणीस पुष्कर शिंदे, सल्लागार नारायण केदार यांनी बैठक घेतली. या वेळी बाबा कदम यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या दाव्यांबद्दल सविस्तर माहिती दिली. दरम्यान, कायदेशीर अडचणी असलेल्या कर्मचाऱ्यांची देणी वगळता 115 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी या महिनाभरात दिली जातील अशी तोंडी तर इतर सर्व दावे तत्काळ निकाली काढण्यात येतील, असे लेखी आश्वासन अग्निशमन दलाच्यावतीने आंबुलगेकर यांनी दिले.