चिंतामणराव देशमुखांसारखा मराठी बाणा आत्मसात करून उत्तम प्रशासक व्हा! सुभाष देसाई यांचे प्रतिपादन

चिंतामणराव देशमुख त्या काळातले प्रशासकीय अधिकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. हे सगळे असताना सरकारमध्ये आले. पुढे देशाचे अर्थमंत्री झाले. पण जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालतील, असे चित्र उभे राहिले तेव्हा त्यांनी तुम्ही हुकूमशहा आहात असे नेहरूंना सुनावले आणि मराठी बाणा दाखवला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या लढय़ामध्ये अनेकजण रस्त्यावर लढले, पण त्याचबरोबर प्रशासनात पण आपला माणूस असला तर त्याचा काय उपयोग होतो आणि त्यांच्या मताची काय किंमत असते हे चिंतामणराव देशमुखांनी दाखवले, असे शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले.

महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या जाणीव न्यासाच्या वतीने आज एमपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून उत्तम नोकरी मिळावी यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी चिंतामणराव देशमुखांची आठवण सांगितली. पदव्या घेऊन नोकऱ्या मिळत नाहीत त्यामुळे रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुरू करा, अशी सूचना देखील त्यांनी केली.

जाणीव ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत म्हणाले, अलीकडेच झालेल्या इन्कम टॅक्स नोकरभरतीत बाराशे कर्मचाऱ्यांपैकी फक्त तीन मराठी मुले निवडली गेली याची खंत वाटली. मराठी माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाला त्याच्या हक्काची नोकरी मिळाली पाहिजे. पण ती नोकरी मिळवताना तो सगळ्या स्पर्धांमध्ये पुढे गेला पाहिजे यासाठी लोकाधिकार समितीची चळवळ सुरू केली. आज त्याचेच एक पुढचे पाऊल म्हणून एमपीएससी आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये आपल्या मुलांनी पुढे जावे यासाठी जाणीव न्यासाच्या वतीने हा वर्ग सुरू करण्यात आलेला आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले.

या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, शिवसेना सचिव सुधीर साळवी, आमदार अजय चौधरी, विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, विभागसंघटक आणि उपनेत्या किशोरी पेडणेकर, विभागसंघटक युगंधरा साळेकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, माजी नगरसेवक अनिल कोकिळ, दत्ता पोंगडे, वराडकर बंधू, विभाग क्र 11 आणि 12 मधील शाखाप्रमुख, शाखा संघटक, जाणीव न्यासाचे प्रकाश शिरवाडकर, संजय ढोलम, बाळा साटम, महेश धुरी, स्मिता तेंडुलकर उपस्थित होते.