
मासिक पाळीत स्वयंपाक केल्याच्या कारणातून सासू आणि नणंदेच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत महिलेचे नाव आहे. जळगावच्या किनोद तालुक्यात ही घटना घडली. आईच्या मृत्यूमुळे दोन मुलं मायेला पोरकी झाली आहेत. दरम्यान, गायत्रीच्या नातेवाईकांनी सासू आणि नणंदेने तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
जळगाव तालुक्यातील किनोद गावात गायत्री, पती, दोन मुलं आणि सासूसोबत राहत होती. गायत्रीचा पती भाजी विक्रीचा व्यवसाय करतो तर गायत्री शिवणकाम करत होती. गायत्रीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, गायक्षीने मासिक पाळीच्या कालावधीत स्वयंपाक केला होता. मात्र मासिक पाळीतील स्वयंपाक तिची सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून घरी वाद झाला आणि हा वाद टोकाला गेला. तिने वडिलांना याबाबत माहिती दिली.
यानंतर सासू आणि नणंदेने तिला मारहाण करत गळा आवळून तिची हत्या केली. मग मृतदेह साडीला बांधून लटकवत तिने आत्महत्या केल्याचा बनाव केला, असा आरोप गायत्रीच्या नातेवाईकांनी केला आहे. गायत्रीने आत्महत्या केल्याचे कळताच पती, सासू आणि नणंद फरार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गायत्रीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला. गायत्रीच्या नातेवाईकांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.