तंदूर रोटीसाठी भरमंडपात वऱ्हाडी भिडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोघांचा मृत्यू

तंदूर रोटीवरून भरमंडपात वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. रवी कुमार उर्फ​कल्लू (18) आणि आशिष कुमार (17) अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे लग्न मंडपात शोककळा पसरली.

अमेठीतील बलभद्र पुर गावातील रहिवासी रामजीवन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नाचे जेवण सुरू झाले. स्वयंपाक्यांनी तंदुरी रोट्या ठेवताच, रवी कुमार आणि आशिष कुमार यांच्यात आधी रोट्या कोणाला घ्यायच्या यावरून भांडण झाले.

हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही तरुणांनी एकमेकांना काठ्या आणि रॉडने मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आशिष वर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर रवी याचा लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

घटनेनंतर तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपास पोलीस करत आहेत.