
मोटरमन कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मोटरमनवर अविश्वास दाखवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने कामगार संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नरमाईची भूमिका घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणतीही प्रशासकीय कार्यवाही केली जाणार नाही. तसेच सिग्नलच्या ठिकाणी हाताने इशारा करण्याची सक्ती नसेल, असे लेखी आश्वासन मध्य रेल्वे प्रशासनाने दिल्यानंतर मोटरमनचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मोटरमन सहाय्यक चालकाविना ड्रायव्हिंग करीत असतो. असे असताना प्रशासनाने मोटरमनला प्रत्येक सिग्नल हाताच्या इशाऱ्याने दाखवून नंबरसहित मोठ्याने कॉल आऊट करण्याची सक्ती केली होती. याविरोधात सर्व कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासन आणि मोटरमन प्रतिनिधी यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रेल कामगार सेनेची महत्त्वपूर्ण भूमिका
रेल कामगार सेनेची भूमिका यात महत्त्वपूर्ण ठरली. रेल कामगार सेना अध्यक्ष खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने कार्याध्यक्ष संजय जोशी आणि सरचिटणीस दिवाकर देव यांनी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला होता. मोटरमन्सचा लढा यशस्वी करण्यासाठी रेल कामगार सेना रनिंग स्टाफप्रमुख प्रशांत कमानकर, अमोघ निमसूडकर, शैलेश प्रधान, विकास पाटील, रामदास शेळके, महेंद्र म्हात्रे यांनी विशेष योगदान दिले.