
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याने देश हादरून गेला असून पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या हल्ल्याचा देश-विदेशातून निषेध होत असतानाच बांगलादेशच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन बोलताना तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत इस्लाम आहे, तोपर्यंत दहशतवाद राहणारच, असे त्या म्हणाल्या. दिल्लीत आयोजित साहित्य महोत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला आणि 2016 मध्ये ढाक्यातील होली आर्टिजन बेकरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हवाला देत तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, जोपर्यंत इस्लाम आहे, तोपर्यंत दहशतवाद राहणार. गेल्या 1400 वर्षांत इस्लामध्ये सुधारणा झालेली नाही. जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत दहशतवाद असाच वाढत राहील.
2016 मध्ये ढाक्यात कलमा म्हणता येत नसल्याने मुस्लिमांना मारण्यात आले. जेव्हा धर्माला मानवता आणि तर्कापेक्षा जास्त महत्त्व दिले जाते तेव्हा असे घडते, असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, युरोपमध्ये चर्चचे रुपांतर संग्रहालयांमध्ये करण्यात आले आहे. पण मुस्लिम अजूनही मशिदी बांधण्यात गुंग आहेत. आधीच हजारो मशिदी असताना पुन्हा पुन्हा आणखी निर्मिती केली जात आहे. याच मशिदींमधून जिहादींची निर्मिती होते. यावेळी त्यांनी मदरशांमधून दिल्या जाणाऱ्या शिक्षणावरही भाष्य केले.
अखंड सावधान! जम्मू-कश्मीरमध्ये ‘टिफीन बॉम्ब’ हल्ल्याचा कट उधळला, IED स्फोटकं जप्त
मदरशांची गरज नाही. कारण मदरशांमध्ये मुलांना फक्त एकच पुस्तक शिकवले जाते. तसे घडू नये. प्रत्येक मुलाला धार्मिक ग्रंथच नव्हे तर सर्व प्रकारची पुस्तके वाचायला दिली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, अमेरिकेमध्ये 10 वर्ष राहिल्यानंतरही तिथे आपलेपणा जाणवला नाही, पण हिंदुस्थानात विशेषत: कोतकाता आणि दिल्लीमध्ये घरासारखे जाणवते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी बांगलादेशातील सद्यस्थितीवरही भाष्य केले. बांगलादेशीतील महिला अजूनही मुलभूत हक्कांपासून वंचित आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच हिंदुस्थानसह सर्वच पुढारलेल्या देशांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याची मागणीही त्यांनी केली.