IPL मुळे शेतकऱ्याचा मुलगा झाला कोट्यधीश, 39 रुपये लावून पठ्ठ्याने जिंकले 4 कोटी

जगातील सर्वात मोठी लीग अशी ओळख असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा धमाका सध्या सुरू आहे. आयपीएल सुरू असताना तुमची ड्रीम टीम निवडा आणि कोट्यवधी जिंका अशी जाहिरात तुम्ही अनेकदा पाहिली असेल. आपल्याकडे आयपीएल सुरू असताना टीम निवडणाऱ्यांची संख्याही कमी नाही. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून थोडीफार रक्कम जिंकणारे तुम्ही तुमच्या आजूबाजूलाही पाहिलेही असतील. मात्र उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यातील मंगल सरोज या शेतकऱ्यांच्या मुलाला एका कंपनीने कोट्याधीश केले आहे. अवघे 39 रुपये लावून या पठ्ठ्याने 4 कोटी रुपये जिंकल्याचे वृत्त ‘न्यूज 18 हिंदी‘ने दिले आहे.

मंगल सरोज हा मार्च महिन्यापासून टीम लावत आहे. आतापर्यंत त्याने 77 वेळा टीम लावली, मात्र प्रत्येक वेळेस नशीबाने त्याला धोका दिला. मात्र 29 एप्रिलला 78व्यांदा त्याने टीम लावली आणि 4 कोटी रुपये जिंकले.

याबाबत बोलताना मंगल सरोज याने सांगितले की, मार्च महिन्यापासून सातत्याने पैसे लावत आहे. प्रत्येक वेळी 49 रुपये लावायचो आणि हरायचो. पण मी हार मानली नाही. यावेळेस खात्यात फक्त 39 रुपये होते, आणि तेवढेच पैसे लावले. 29 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्जमध्ये झालेल्या लढतीवेळी टीम बनवली आणि बाजी मारली. संबंधित अॅपवर 4 कोटी जिंकल्याचे दाखवत आहे, पण हे पैसे अद्याप खात्यात जमा झालेले नाही, असेही त्याने सांगितले.

दरम्यान, मंगल सरोज हा उत्तर प्रदेशमधील कौशंबी जिल्ह्यातील घासीराम येथील रहिवासी आहे. त्याचे वडील सुखलाल सरोज हे सरकती असून दुसऱ्याची शेती घेऊन कसतात. शेतीतील काही उत्पन्न मालकाला, तर उर्वरित याच्यातून स्वत:च्या कुटुंबाचे पालनपोषण करतात. आता मंगलने 4 कोटी जिंकल्याने त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असून गावातील लोकही त्यांच्या घरी अभिनंदनासाठी येत आहेत. या जिंकलेल्या पैसे योग्य जागी गुंतवणार असून उद्योग-व्यवसायासाठी वापरणार असल्याचे मंगल सरोज याने सांगितले.