
दुर्मिळ सायमन गिब्बन मंकी, गोल्डन गिब्बन मंकी आणि पिगटेल मकाक या माकडांना मलेशिया येथून तस्करी करून मुंबईत आणणारे चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीराम सुब्रमनीयना आणि मलेशियामधील मथावी संल्लाकुन्डु या दुकलीला ठाणे वनविभागाने मोठय़ा शिताफीने मुंबईतून अटक केली. त्यांच्याकडून 4 सायमन गिब्बन मंकी, 3 गोल्डन गिब्बन मंकी, 2-पिगटेल मकाक अशी 9 माकडे हस्तगत केली. मात्र त्यामधील फक्त पिगटेल मकाक हा एकच माकड जिवंत राहिले तर 8 माकडांचा मृत्यू झाला. अटक केलेल्या आरोपींना 7 दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे.
मुंबईतील कुलाबा येथील हॉटेल जनता येथे अवैधरित्या दुर्मिळ माकडे घेऊन काही जण येणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार दोघांना संशयावरून ताब्यात घेत तपासणी केली असता, चेन्नईच्या श्रीराम सुब्रमनीयना आणि मलेशियाच्या मथावी संल्लाकुन्डु या दुकलीकडे वेगवेगळ्या तीन प्रजातीचे 9 माकडे आढळली.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक ठाणे, के प्रदिपा व उप वनसंरक्षक ठाणे, वनविभाग ठाणे सचिन रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक वनसंरक्षक ठाणे सोनल वळवी व वनक्षेत्रपाल मुंबई राकेश भोईर यांच्या पथकाने केली. त्या पथकात मस्जिद बंदर वनपाल पंकज गढरी, वनरक्षक सुरेद्र पाटील, स्वप्नाली यांदव, सचिन नागरगोजे व विक्रम पवार हे कर्मचारी सहभागी झाले होते.
आरोपींना 7 दिवसांची वनकोठडी
आरोपींकडे चौकशीत कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाल्यानंतर ती माकडे ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 (सुधारित 2022) चे कलम 9,39,44,48,48 (A), 49 व 51 चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. आज त्या दोघांना मुंबई, किल्ला कोर्ट येथील न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्या दोघांना 7 दिवसांची वनकोठडी सुनावली.