
शेअर बाजारात असणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने सांगलीसह ग्रामीण भागातही फसवणुकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. दहा ते वीस टक्के परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांनी व्याजाने पैसे काढून ते गुंतवले. मात्र, भामट्या एजंटांनी नागरिकांना चुना लावला. जिल्ह्यात १ जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या एकवर्षाच्या कालावधीत १२ गुन्हे दाखल असून, १८ जणांना अटक केली आहे.
सन २०२४ मध्ये ७ कोटी ७६ लाख ९० हजार ३२६, तर २०२५ मध्ये गेल्या चार महिन्यांत १४ कोटी ८८ लाख ५ हजार ३४३ रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. झटपट श्रीमंत आणि पैशांच्या हव्यासापोटी २२ कोटींचा फटका सर्वसामान्य लोकांना भामट्यांनी घातला आहे. आकडेवारी पाहिली असता, फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शेअर मार्केटमधून जास्त परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक सर्वत्र सुरू आहे. यापूर्वीच शहरी भागातील कोट्यवधींची फसवणूक झाल्याने पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यानंतरही फसवणुकीचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.
झटपट पैसा मिळविण्याच्या हव्यासापोटी जिल्ह्यात अनेक सुशिक्षित लोक आमिषाला बळी पडत आहेत. लोकांनी कर्ज काढून एजन्सींच्या बँक खात्यांवर लाखो रुपये भरले. या फसवणुकीमध्ये भरकटलेल्या अनेक व्यक्तींचे संसार उघड्यावर पडले आहेत. ज्यांनी गुंतवणूक केली, त्यांना पहिले दोन हप्ते त्यांच्याच पैशात दिले जात आहेत. तिसऱ्या हप्त्यानंतर एजंटांकडून टाळाटाळ केली जाते. यासाठी पोलिसांनी शोधमोहीम राबवून भामट्यांचा पर्दाफाश करण्याची गरज निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागालाही शेअर मार्केटचा डंख लागला आहे. दहा टक्के ते वीस टक्के परताव्याचे आमिष दाखवून नागरिक व्याजाने पैसे काढून ते गुंतवू लागले आहेत. मात्र, भामट्या एजंटांकडून दोन-तीन महिने पैसे दिल्यानंतर चालढकल करून नागरिकांना चुना लावला जात आहे. त्यासाठी नागरिकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती कोटी रुपयांमध्ये आहे. बँका, पतसंस्था आणि पोस्टातील विविध योजनांमधील गुंतवणुकीचे व्याजदर कमी होऊ लागल्यामुळे दुसरा पर्याय म्हणून शेअर बाजाराकडे अनेकजण वळत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास कमी काळात दामदुप्पट रक्कम तसेच जादा व्याज दराने पैसे मिळतील, असे आमिष भामटे गुंतवणूकदारांना दाखवत आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेकडे असा होतो तपास
अपहाराची रक्कम मोठी असल्याने या गुन्ह्यांचा अभ्यासपूर्ण तपास केला जात आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक झाली आहे. काहींनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखा विभाग आहे. या विभागाकडून तक्रारींची पडताळणी केली जाते. तक्रारदारांकडून डिटेल्स घेतली जाते. त्यांनी पैसे कोणत्या खात्यावर पाठवले, त्या फर्मचे रजिस्टर तपासले जाते. संशयितांच्या पार्टनर्सची माहिती घेतली जाते. ज्या बँक खात्यावर पैसे असतील तर ते खाते फ्रिज केले जाते. यानंतर गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया केली जाते.