
कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांविरोधात आता हिंदुस्थान कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. यावर केंद्रीय गृहखात्याने देशातील सर्व राज्यांना उद्या (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश देऊ केले आहेत. यावेळी हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जाणार आहेत. तसंच ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षणही यावेळी दिले जाणार आहे. सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील आता हायअलर्ट मोडवर आहे.
पाकिस्तान सोबत युद्ध करण्याचे ठरल्यानंतर, दरम्यान 1971 मध्येही राज्याराज्यात मॉक ड्रील घेण्यात आलेलं होतं. यावेळी शहरात सायरन वाजायचे, ब्लॅक आऊटचा सरावही केला जायचा असा अनुभव आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात. ड्रीलदरम्यान सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत. लाईट सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉकड्रीलमध्ये केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आला असून, प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉकड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील या 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील-
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंंधुदुर्ग