फेरफटका जिवावर बेतला, वाडीबंदर येथे हिट अॅण्ड रन

दक्षिण मुंबईतील वाडीबंदर परिसरात हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारने धडक दिल्याने पुरुषाचा मृत्यू झाला. फकरुदिन सय्यद असे मृताचे नाव आहे. पत्नीसोबत गप्पा मारल्यानंतर फकरुदिन आज पहाटे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

फकरुदिन हे कुटुंबीयांसोबत चेंबूर येथे राहायचे. ते पायधुनी येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांची पत्नी, मुलाला आधारकार्ड बनवायचे असल्याने ते मशीद बंदर येथे आले. आज पहाटेच्या सुमारास दाना बंदर येथील घराजवळ फकरुदिन आणि त्याची पत्नी हे गप्पा मारत बसले होते. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर फकरुदिन हे फेरफटका मारण्यासाठी पी.डी. मेलो रोड येथे गेले. पी डी. मेलो रोडने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वाडीबंदरच्या उत्तर वाहिनीवर चालत होते. तेव्हा पांढऱ्या रंगाच्या वाहनाने त्याना धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनचालक पळून गेला. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. तिने आरडाओरड केल्यानंतर फकरुदिनला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी फकरुदिनला मृत घोषित केले. घडल्या प्रकाराची माहिती समजताच पायधुनी पोलीस घटनास्थळी गेले. फकरुदिनच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.