एक एक दहशतवादी मारा… डोक्यात, छातीत गोळया घाला… हातपाय तोडून मारा! पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांची संतप्त भावना

आता जो हल्ला केला तो अतिशय योग्य असून ही कारवाई न थांबवता एक-एक दहशतवादी मारावा. त्यांनी जसे आमच्या लोकांना मारले तसेच त्यांच्या डोक्यात, छातीत गोळ्या घाला, हात-पाय तोडून मारा, हीच खरी माझे पती संतोष जगदाळे यांच्यासह पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकांसाठी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी व्यक्त केली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाङ्गी हिंदुस्थानच्या लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रगती जगदाळे म्हणाल्या, पहलगाम येथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी सौ. प्रगती संतोष जगदाळे होते. प्रत्येक सुहासिनीला कुंकवाचे महत्त्व किती असते हे कोणीही समजू शकत नाही. परंतु प्रत्येक स्त्रीला ते जाणवत असते. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी माझे कुंकू पुसले. या हल्ल्यात माझे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर पंधरा दिवसांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला केला. आता हा हल्ला थांबवू नये. प्रत्येक दहशतवाद्याची पाळेमुळे शोधून त्यांना वेचून मारावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कारवाई पाहून माझ्या वडिलांनाही भारी वाटत असेल – आसावरी

पहलगाम येथील हल्ल्यात ज्यांना वीरमरण आले त्यांना आपल्या सैन्याने आज खऱया अर्थाने श्रद्धांजली वाहिली. मागील पंधरा दिवसांपासून आम्ही खूप दुःखात होतो. आज आम्हाला आनंदाची गोष्ट कळाली. ही कारवाई पाहून माझे वडील जिथून कुङ्गून हे सगळे बघत असतील तर त्यांनाही भारी वाटत असेल, अशी भवना संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिने व्यक्त केली.

शहीदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण – संगीता गणबोटे

दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईने मी समाधानी आहे. या कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देऊन शहीदांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे व आम्हाला सन्मान दिला आहे. यापुढे हिंदुस्थानचे नावही उच्चारताना पाकिस्तानला भीती वाटली पाहिजे अशी कारवाई करावी, अशी मागणी कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनी केली.

दहशतवाद मुळासकट उखडून टाकायला हवा – हर्षल लेले

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आमच्या कुटुंबाला न्याय मिळाला. परंतु माझी सरकारला विनंती आहे की, असे एक ऑपरेशन न करता अनेक ऑपरेशन करून दहशतवाद मुळासकट उखडून टाकला पाहिजे. दहशतवाद्यांना अशी अद्दल घडवायची की, हिंदुस्थानवर पुन्हा हल्ला करायला ते उरलेच नाही पाहिजे, अशी भावना पहलगाममधील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवली येथील संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने व्यक्त केली. आज टीव्हीवर बातमी बघताना मला आज वडिलांची आठवण आली. पुलवामा हल्ला झाला तेव्हा बाबांनी मला मिङ्गी मारली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माझे बाबा, दोन्ही मामा आणि इतर 26 जणांना शांती मिळाली असेल, असेही हर्षल म्हणाला.

हिंदुस्थानच्या कारवाईने समाधान – ऋचा मोने

पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या 26 पर्यटकांच्या आत्म्याला खऱया अर्थाने शांती मिळाली, अशी भावना मृतांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला होता. हिंदुस्थानी लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम राबवत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी यांचे सासरे जयंत भावे, अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने, मुलगी ऋचा मोने यांनी समाधान व्यक्त केले.