अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पॅलेस्टिनी समर्थकांचा गोंधळ, 10-12 विद्यार्थ्यांना अटक

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये असणाऱ्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा पॅलेस्टिनी समर्थकांनी गोंधळ घातला आहे. जवळपास 100 हून अधिक पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थ्यांनी ग्रंथालयामध्ये धुडगूस घातला. यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ग्रंथालयाबाहेर काढले असून 10 ते 12 विद्यार्थ्यांना अटक केल्याचे वृत्त ‘रॉयटर्स‘ने दिले आहे.

इस्रायलने हमास या दहशतवादी संघटनेविरुद्ध गाझा पट्ट्यात कारवाई सुरू केल्यापासून कोलंबिया विद्यापीठामध्ये पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थ्यांचे निषेध आंदोलन सुरू आहे. गेल्यावर्षी या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थ्यांनी हॅमिल्टन इमारतीमध्ये प्रवेश करत त्यावर कब्जा केला होता. त्यावेळी विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. आता बुधवारीही असाच प्रकार घडला.

बुधवारी कोलंबिया विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयामध्ये घुसून 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी इस्रायल विरोधात निदर्शने केली आणि ग्रंथालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी टेबलावर चढत ढोल वाजवले आणि बॅनर फडकावले. ‘स्ट्राइक फॉर गाझा’ आणि ‘लिबरेटेड झोन’ असे या बॅनरवर लिहिण्यात आलेले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यात विद्यार्थी मास्क घातून ही निदर्शने करत असल्याचे दिसते.

यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पांगण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थ्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले असून पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनीही या संदर्भात एक ट्विट केले आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयावर ताबा मिळवणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्या आणि तोडफोड करणाऱ्यांच्या व्हिसा स्थितीचा आम्ही आढावा घेत आहोत. आपल्या या महान देशामध्ये हमासचे समर्थन करणाऱ्या गुंडांना स्थान नाही, असे मार्को रुबियो म्हणाले.