Uttarkashi Helicopter Crash- उत्तरकाशीत मोठा अपघात, खासगी हेलिकॉप्टर कोसळून 4 जणांचा मृत्यू

उत्तरकाशीतील गंगनानी भागात नुकतीच मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक खासगी हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा प्रवासी होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच उत्तरकाशीचे डीएम घटनास्थळी रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. गंगनानीच्या पुढे असलेल्या नाग मंदिराच्या खाली भागीरथी नदीजवळ हे खासगी हेलिकॉप्टर कोसळले. प्रवाशांनी भरलेले हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्षिल हेलिपॅडसाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, लष्कराचे जवान, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केले. यावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून मृतांना देखील शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले.