
हिंदुस्थानच्या शौर्याचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय चेतनेचा एक भाग असलेल्या ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) ट्रेडमार्क करण्याचा रिलायन्स इंडस्ट्रीजचा कोणताही हेतू नाही, असे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक युनिट असलेल्या जिओ स्टुडिओजमधील एका ज्युनिअर व्यक्तीने अनवधानाने परवानगीशिवाय ट्रेडमार्क अर्ज दाखल केला होता, अशी कबुली दिली असून आता तो अर्ज तात्काळ मागे घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सर्व भागधारकांना पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा सार्थ अभिमान आहे. दहशतवादाच्या दुष्टतेविरुद्ध हिंदुस्थानच्या लढाईत ऑपरेशन सिंदूर हे आमच्या शूर सशस्त्र दलांचे अभिमानास्पद यश आहे.
दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत रिलायन्स आमच्या सरकार आणि सशस्त्र दलांना पूर्णपणे समर्थन करते. ‘इंडिया फर्स्ट’ या ब्रीदवाक्याप्रती आमची वचनबद्धता अढळ आहे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.