Chhatrapati Sambhaji Nagar – मिंधे गटाच्या विधानसभा संघटकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

ट्रान्सपोर्ट मालकाकडून ओव्हरलोड वाहनांवर कारवाई न करण्यासाठी आरटीओतील फिरत्या पथकाच्या अधिकाऱ्याच्या नावाखाली पन्नास हजारांची लाच घेताना आरटीओतील दलाल दीपक साहेबराव पवार यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी आरटीओ परिसरातील एका प्लाझा बिल्डिंगमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे लाचखोर हा मिंधे गटाचा विधानसभा संघटक आहे.

ट्रान्सपोर्ट मालकाच्या दहा ट्रक आहेत. या ट्रक- ट्रेलरमधून डिझेल इंजिनची वाहतूक छत्रपती संभाजीनगर ते चेन्नई अशी करण्यात येते. ही वाहने ओव्हरलोड असतात. त्यामुळे गेल्या महिनाभरात आरटीओ विभागाच्या वतीने मोटर वाहन निरीक्षक यांच्याकडून ओव्हरलोड वाहनांना दंड ठोठावण्यात आला होता. ही कारवाई टाळण्यासाठी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वाहन कारवाईविना जाण्यास सूट देण्याकरिता मोटार वाहन निरीक्षक यांच्यासाठी आरटीओतील दलाल दीपक साहेबराव पवार (वय – 45, रा. गजानननगर, गारखेडा परिसर) याने प्रतिवाहन पाच हजार रुपये असे एकूण दहा वाहनांना पन्नास हजार रुपयांची लाच मागतली होती.

ट्रान्स्पोर्ट मालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या लाचेची पडताळणी केली असता आरोपी दीपकने लाच मागितल्याचे समोर आले होते. पथकाने आज शुक्रवारी सापळा रचून त्याला 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल ही जप्त केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, मुकुंद आघाव, सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिलीप साबळे, पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे, जमादार जिवडे, राजेंद्र जोशी, विलास चव्हाण यांच्या पथकाने केली.

म्हणे, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी माझे पाहुणे

लाचलुचपत विभागाच्या पथकाने दीपक पवार याला ताब्यात घेताच त्याने ‘मिंधे गटाचा पदाधिकारी तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी माझे पाहुणे आहेत!’ असा दम पथकाला भरला. पथकाने अखेर बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेत ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.