
नवी मुंबईत भाजपचे गणेश नाईकविरुद्ध मिंधे गट असे कोल्ड वॉर सुरू असतानाच आज मिंधे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यावर थेट सर्जिकल स्ट्राईकच झाला. चौगुले यांनी ऐरोलीत उभारलेल्या पंचतारांकित सुनील चौगुले स्पोर्टस् क्लबवर भल्या पहाटे वनविभाग, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने संयुक्त कारवाई करत हे फाईव्ह स्टार स्पोर्ट्स क्लबमधील बेकायदेशीर टिपटॉप फास्ट हॉटेल, फालुदा कॉर्नर, फालुदा चौक, स्नानगृह आणि शौचालय बुलडोझर लावून जमीनदोस्त केले. यावेळी तीनही विभागासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. एकीकडे शिंदे गटाकडून भाजपचे मंत्री गणेश नाईक यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच आज थेट महापालिका युद्धालाही सुरुवात झाली. विजय चौगुलेंचे स्पोर्ट्स क्लब जमीनदोस्त करण्याची कारवाई भाजपच्या एका बड्या नेत्याच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याची आदळआपट मिंध्यांनी सुरू केल्याने नवी मुंबईत महायुतीतच वॉर पेटले आहे.
ऐरोलीतील वर्चस्वाची लढाई विधानसभा निवडणुकीत ऐरोली विधानसभेतून भाजपचे गणेश नाईक यांच्यासमोर मिंधे गटाचे विजय चौगुले अपक्ष उभे होते. यावेळी चौगुलेंनी प्रचारात नाईकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या निवडणुकीत गणेश नाईक विजयी झाले. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिंधे गटाकडून नाईक यांची कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यातूनच ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
ऐरोलीतील सेक्टर 19 मधील युरो स्कूलसमोर विजय चौगुले यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. कांदळवनांची कत्तल करून या स्पोर्टर्स क्लबमध्ये टिपटॉप फास्ट फूड कॉर्नर हॉटेल, फालुदा चौक, स्नानगृह आणि शौचालय उभारण्यात आले आहे. ही बेकायदा बांधकामे त्वरित हटवावीत अशा नोटिसा नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिल्या होत्या. मात्र चौगुले यांनी या नोटिसांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे आज भल्या पहाटे ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील काटोळे, उपअभियंता (प्रभारी) रोहित ठाकरे, कनिष्ठ अभियंता संदीप म्हात्रे यांच्यासह वनखाते व सिडकोचा मोठा फौजफाटा, तीन जेसीबी, दोन डंपर, एक पोकलेन आणि 15 मजुरांसह चौगुलेंच्या स्पोट्र्ट्स क्लबवर धडकला. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तब्बल दीडशे पोलिसांचा फौजफाटा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता. या पथकाने विजय चौगुले यांनी उभारलेल्या स्पोर्ट्स क्लबमध्ये कांदळवनांची कत्तल करून त्याजागी उभारलेले टिपटॉप फास्ट फूड हॉटेल, फालुदा कॉर्नर, स्नानगृह व शौचालये यांच्यावर थेट बुलडोझर चालवला आणि ही सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली.
मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नवी मुंबईकरांच्या पोटात धस्स
हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरू झाले आहे. संपूर्ण देशासह नवी मुंबईतही दोन दिवस मॉकड्रिल करण्यात आले. एकीकडे युद्धाच्या बातम्या सुरू असताना भल्या पहाटे ऐरोलीत इतका मोठा पोलीस फौजफाटा आणि यंत्रणा पाहून मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नवी मुंबईकरांच्या पोटात धस्स झाले, परंतु हे कोणतेही युद्ध नसून नेहमीप्रमाणे महायुतीत सुरू असलेले राजकीय युद्ध असल्याचे समजताच सर्वांनी मोकळा श्वास घेतला.