छत्रपती शिवाजी महाराज की जय! मालवणच्या राजकोटवर शिवरायांचा 103 फुटांचा दिमाखदार पुतळा

सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ले राजकोटवर नऊ महिन्यांत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 103 फुटी भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी राजकोटचा परिसर शिवरायांच्या जयघोषाने
दुमदुमला.

राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी त्या पुतळ्याचे अनावरण केले होते, परंतु सहा महिन्यांतच तो कोलमडून पडला होता. त्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली होती. केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्काळजीपणाचा शिवभक्तांनी तीव्र निषेध केला होता. त्यानंतर राज्य शासनाने नवा पुतळा उभारण्याची घोषणा केली होती. आता नऊ महिन्यांनंतर शिवरायांचा दिमाखदार पुतळा साकारला आहे.

  • ब्राँझ आणि जस्त धातूचा वापर करून उभारण्यात आलेला हा पुतळा वादळवाऱ्यातही 100 वर्षे टिकेल, असे शिल्पकार राम सुतार आणि अनिल सुतार यांनी सांगितले. धातूचा असला तरी वीजही पुतळ्याला स्पर्श करू शकणार नाही, अशा पद्धतीने तो उभारला गेला आहे.
  • पुतळय़ाची नियमित देखभाल व पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराकडे दिली आहे.

पुतळ्याच्या परिसरात शिवसृष्टी

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या देखरेखीखाली हा पुतळा उभारण्यात आला आहे. या कार्यात त्यांचे शिल्पकार पुत्र अनिल सुतार आणि टीमने मोलाचे योगदान दिले. दहा फुटांचा चबुतरा आणि त्यावर तलवारीच्या उंचीपर्यंत 93 फुटी पुतळा असा एकूण 103 फूट उंचीचा हा पुतळा पूर्वीच्या पुतळय़ापेक्षा मजबूत आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुतळय़ाचे अनावरण आणि पूजन करण्यात आले. तसेच शिल्पकार आणि संबंधित अधिकाऱयांचा सन्मान करण्यात आला. पुतळय़ाच्या परिसराचा शिवसृष्टी म्हणून विकास करण्यात येईल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.