
हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवत यशस्वी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूरमध्ये हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. दरम्यान ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी हिंदुस्थानच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांनी दररोज पत्रकार परिषद घेत आपण साध्य केलेल्या यशाबाबत माहिती दिली. रविवारी शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर तिन्ही दलाच्या पत्रकार परिषदेत एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण हिंदुस्थानमधून त्यांचे कौतुक केले जात आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे एअर मार्शल अवधेश कुमार भारती हे बिहारमधील झुन्नी कला येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कामगिरीचा त्यांच्या कुटुंबाला आणि गावाला खूप अभिमान आहे. सिंचन विभागात नोकरी करणाऱ्या लिपिक आणि एका सर्वसामान्य गृहिणीचा मुलगा अवधेश कुमार भारती नेहमीच शिक्षणात अव्वल होते. त्यांना शिक्षणातील नवीन गोष्टी आत्मसात करण्याची आवड होती. त्यामुळे त्याची निवड झारखंडमधील तिलैया येथील सैनिक शाळेत झाली. पुढे त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेतला आणि हवाई दलात काम करत देशसेवा करण्याचे स्वप्न साकार केले.
एअर मार्शल अवधेश कुमार 1978 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाच्या लढाऊ विभागात दाखल झाले. त्यांना 2008 मध्ये राष्ट्रपती वायुसेना पदक देण्यात आले आणि 2023 मध्ये त्यांना हवाई दलाचे एअर मार्शल म्हणून बढती देण्यात आली. ते सुखोई-30 स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर होते. एअर मार्शलपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी ते प्रयागराज येथील सेंट्रल एअर कमांडमध्ये वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (एसएएसओ) म्हणून तैनात होते.
ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण देश हवाई दलाचे एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांची पाठ थोपटत आहे. अशातच त्यांच्या आई उर्मीला देवी यांनीही आपल्या मुलाच्या यशाचं भरभरून कौतुक केलं आहे. ‘तो लहानपणी खूप साधा होता आणि आजही तसाच आहे. त्याला लहानपणापासूनच सशस्त्र दलात सामील व्हायचे होते. आणि असे तो नेहमी म्हणायचा. तो फक्त म्हणालाचं नाही तर त्याने ते साध्यही केले,” असे एअर मार्शल भारती यांच्या आई उर्मिला देवी म्हणाल्या.
20 दिवसांनंतर पाकिस्तानच्या ताब्यातील बीएसएफ जवानाची झाली सुटका
भारती एक ‘देशभक्त’ आहेत आणि देशासाठी आपली कर्तव्य पार पाडत आहे. माझ्या मुलाने झुन्नी कला आणि पूर्णियामध्ये आपली छाप सोडली आहे… त्याने स्वतःसाठी चांगले काम केले आहे आणि त्याच्या मुलांनीही तेच करावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने कश्मीरमधील एका महिलेशी लग्न केले आहे. मला त्याचा खूप अभिमान आहे. मला माझ्या मुलाबद्दल मला काही सांगायची गरज नाही, ते जगाने पाहिले आहे. मी खूप आनंदी आहे. जगाला माहित आहे की कोणाच्या मुलाने, कोणाच्या नातवाने देशाला अभिमान मिळवून दिला,”असे त्या म्हणाल्या.
एअर मार्शल भारती यांचे वडील जीवन लाल यादव यांनाही मुलाच्या कामगिरीवर अभिमान आहे. पाकिस्तानमधील प्रमुख दहशतवादी तळांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये एअर मार्शल भारती यांनी काय भूमिका बजावली होती. याबद्दल मला माहिती नव्हते. वर्तमान पत्रात जेव्हा मुलाचं नाव पाहिलं तेव्हा मला समजलं, असं ते म्हणाले. माझा मुलगा वर्षभरापूर्वीच आम्हाला भेटायला आला होता. पण त्याने आमच्याशी त्याच्या कामाविषयी कोणतीही गोपनीय माहिती कधीच शेअर केली नाही. आम्हाला फक्त त्याच्या कामाचे बारकावे माहिती आहेत. मला खूप आनंद आहे की आपला देश नवीन उंची गाठत आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आणि त्यात माझ्या मुलाची भूमिका होती. यामुळे मला त्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो,” असे जीवन लाल यादव म्हणाले.