आजीची कमाल… नातवासह दहावीची परीक्षा उत्तीर्ण, हिंगणघाटच्या इंदू सातपुते यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

वय शिक्षणाच्या आड कधीच येत नाही. मनात शिकण्याची जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास वयाची साठी ओलांडल्यानंतरही दहावीची परीक्षा उत्तीर्ण होता येते हे वर्धा जिह्यातील हिंगणघाटमधील 68 वर्षांच्या इंदू सातपुते या आजींनी दाखवून दिले. सकाळी शेतीची कामे, दिवसभर घरातील कामे, सायंकाळीची शिकवणी आणि पुन्हा रात्री घर येऊन अभ्यास असा दिनक्रम सांभाळून इंदू सातपुते यांनी दहावीच्या परीक्षेत 51 टक्के गुण मिळवले. विशेष बाब म्हणजे इंदू सातपुते यांचा नातू धीरज बोरकर 75.60 टक्के गुण मिळवून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. अशी ही आजी-नातवाची जोडी चर्चेचा विषय ठरलीय.

इंदू सातपुते यांना इयत्ता सातवीनंतर शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले होते. घरापासून शाळा दूरवर असल्यामुळे कुटुंबानेही इंदू यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शाळेत पाठविले नाही. त्यानंतर काही वर्षांनी त्यांचा विवाह झाला आणि सासरी आल्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. मात्र शिक्षणाची आणि काही तरी नवीन करण्याची आवड यामुळे त्यांनी वाचन व लेखन सुरू ठेवले, भजनात दंग झाल्या आणि हिंगणघाटमधील जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षपदी काम करून संघटनात्मक कौशल्यही प्राप्त केले.

हिंगणघाटमधील जामनीतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भरणाऱ्या प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या शिकवणी वर्गात सायंकाळी दोन ते तीन तास नित्यनेमाने हजेरी लावू लागल्या. त्यानंतर रात्री घरी येऊन पुन्हा दोन ते तीन तास अभ्यास केला. नातवाची त्यांनी मदत घेतली. नातू धीरजनेही त्याला मदत केली. त्यानंतर आजी व नातवाने एकत्र अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत यश मिळविले.

‘आयुष्यातील कोणत्याही परीक्षेला घाबरायचे नाही. मेहनत व जिद्दीच्या जोरावर संधीचे सोने करू शकतो. मी शिक्षणाची आवड आणि सरावाच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत यश मिळविले,’ असे इंदू सातपुते यांनी सांगितले.

शिक्षणाचा ‘सेकंड चान्स’

विविध कारणांमुळे अनेक महिला शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडतात आणि त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. त्यांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ‘सेकंड चान्स’ या उपक्रमातून होणार आहे. 2 हजार 310 महिलांनी ‘सेकंड चान्स’चे सोने केले. या उपक्रमाच्या माध्यमातून 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीची 2 हजार 493 महिलांनी परीक्षा दिली आणि 2 हजार 310 महिला उत्तीर्ण झाल्या. 93 टक्के इतकी उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.