घोडबंदर-भाईंदर बोगदा, एलिव्हेटेड पुलाचे काम रखडणार, ‘एल ऍण्ड टी’च्या याचिकेवरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला

ठाणे घोडबंदर ते भाईंदर या बोगदा आणि एलिव्हेटेड रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाच्या निविदेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे तसेच या प्रकल्पाची निविदा तूर्तास उघडू नये असे आदेश दिले आहेत.

एमएमआरडीएकडून ठाण्याच्या घोडबंदर रोड ते भाईंदर पर्यंत एलिव्हेटेड रोड बांधण्यात येणार आहे. वसई खाडीवरील 9.8 किमी लांबीचा एलिव्हेटेड पूल बांधण्यात येणार असून बोगदाही बांधला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. आपल्या निविदेच्या स्थितीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर सहभागी इतर कंपन्यांना ती माहिती देण्यात आल्याचा दावा करत एलअँडटी कंपनीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज गुरुवारी न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

कंपनीने 30 डिसेंबर 2024 रोजी दोन्ही निविदा सादर केल्या. एमएमआरडीएने 1 जानेवारी रोजी तांत्रिक निविदा उघडल्या होत्या, परंतु, कंपनीला निकालाबाबत कळवण्यात आले नाही, असा युक्तिवाद एलअ‍ॅण्डटीच्या वतीने करण्यात आला तर पात्र बोलीदारांनाच निविदा प्रक्रियेतील त्यांच्या स्थितीची माहिती दिली जाते इतर सहभाग घेतलेल्या कंपन्यांना माहिती दिली जात नाही. असा युक्तिवाद एमएमआरडीच्या वतीने करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत एलअ‍ॅण्डटीच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला.