ब्रम्होस क्षेपणास्त्राने पाकिस्तानला दिवसाउजेडी तारे दाखवले- राजनाथ सिंह

ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. तिथे त्यांनी हिंदुस्थानी सैन्याची भेट घेतली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक संदेश देत म्हटले की, ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पिचर अभी बाकी हैं! वेळ आल्यावर आम्ही सर्व चित्र स्पष्ट करु. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानी हवाई दलाचे खूप कौतुक केले.

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भूजमध्ये म्हणाले, “आपल्या हवाई दलाला पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश आहे ही काही छोटी गोष्ट नाही, हे पूर्णपणे सिद्ध झाले आहे. आज परिस्थिती अशी आहे की, हिंदुस्थानची लढाऊ विमाने सीमा ओलांडल्याशिवाय, प्रत्येक कोपऱ्यात हल्ला करण्यास सक्षम आहेत. आॅपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या भूमीवरील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचे संपूर्ण जगाने पाहिले आहे.

राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे कौतुक केले. अधिक बोलताना ते म्हणाले, “ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाकिस्तानने स्वतः पाहिली आहे. आपल्या देशात एक जुनी म्हण आहे आणि ती म्हणजे – दिवसा तारे दाखवणे. पण हिंदुस्थानात बनवलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राने रात्रीच्या अंधारात पाकिस्तानला दिवसाचा प्रकाश दाखवला आहे. हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच डीआरडीओने बनवलेल्या ‘आकाश’ आणि इतर रडार प्रणालींनी त्यात मोठी भूमिका बजावली आहे.

हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानी लष्करी तळांचे मोठे नुकसान झाले. या काळात हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचा समावेश होता.