
केरळ राज्यात येत्या 2 जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात दहावीच्या 4.3 लाख विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स शिक्षण अनिवार्य केले जाणार आहे. रोबोटिक्स शिक्षण बंधनकारक करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले आहे.
रोबोटिक्स ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावी, म्हणून आयसीटी-दहावीच्या पाठ्यपुस्तकात ‘द वर्ल्ड ऑफ रोबोट’ या धड्याचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये सर्किट बांधकाम, सेन्सर्स आणि अॅक्च्युएटर आणि संगणक प्रोग्रामिंग वापरून इलेक्ट्रॉनिक उपकरणे नियंत्रित करणे आदींचा अंतर्भाव आहे, असे केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नोलॉजी फॉर एज्युकेशनचे सीईओ आणि आयसीटीचे पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष के. अन्वर सदाथ यांनी एका निवेदनाद्वारे सांगितले.
नव्या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आधीच केरळ राज्यातील शाळांमध्ये 29 हजार रोबोटिक कीटचे वाटप करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीला रोबोटिक किटचा वापर करून सॅनिटायजर डिस्पेंसर बनवण्यास शिकवले जाईल. सॅनिटायजर डिस्पेंसर आपल्या हाताजवळ येताच आपले काम सुरू करेल. त्याच्या निर्मितीसाठी अरडुइनो ब्रेडबोर्ड, आयआर सेन्सर, सर्वो मोटर आणि जंपर तार यांचा वापर केला जाईल.