
अमृत भारत योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. त्यासाठी दहा कोटी 48 लाख रुपये पहिल्या टप्प्यात मंजूरही केले. परंतु अजूनही मोठा गाजावाजा करत सुरू केलेला विकास प्रत्यक्षात भकास असल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकावर बरीच काम अजूनही अपूर्ण आहेत. असे असताना येत्या 22 तारखेला पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने रेल्वे स्टेशनचे उद्घाटन होणार आहे.

अमृत भारत योजनेअंतर्गत लोणंद स्थानकाचा विकास केला जात आहे. तब्बल 10.47 कोटी रुपयांची गुंतवणूक स्थानकाच्या विकासासाठी करण्यात आली आहे. तसेच आता रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनची सुद्धा गडबड प्रशासनाने सुरू केली आहे. परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळं आहे. रेल्वे स्थानकाचा काही भाग विकसीत झाला आहे. परंतु अजूनही रेल्वे स्थानकावर बऱ्याच गोष्टी अपूर्ण आहेत.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही, शौचालयाची सोय नाही. त्याचे काम अजूनही सुरू आहे. बेवारस कुत्र्यांचा स्थानकात वावर आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष बाब म्हणजे नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे प्लॅटफॉर्मवर पाण्याचे तळे साचले आहे. अशी परिस्थिती असताना प्रशासन उद्घाटनाची गडबड का करत आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
