
माता गुजरीजी विसावा उद्यान येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्थळी वाढदिवसाची पार्टी करून त्याठिकाणी बिर्याणी, दारू, केक याचा पसारा करून मुक्तिसंग्राम स्मारकाची विटंबना करण्यात आली होती. 24 एप्रिल रोजी झालेल्या या घटनेसंदर्भात अखेर 18 मे रोजी शिवाजीनगर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
24 एप्रिल रोजी माता गुजरीजी विसावा उद्यानात रात्री वाढदिवसाची पार्टी करत काही जणांनी धुडगूस घातला. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे स्मारक असलेल्या चौथऱ्यावर व बाजूला केक, बिर्याणीचे जेवण व दारूच्या बाटल्या त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. घडलेला प्रकार गंभीर असल्याने दैनिक सामनाने यावर आवाज उठविला होता. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची कविता लिहिणाऱ्या प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनीही याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. 24 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे हे रजेवर असल्याने हे प्रकरण चौकशीवर ठेवण्यात आले. पालकमंत्र्यांनी 1 मे रोजी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांना याबाबत सक्त आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली.
उद्यान पर्यवेक्षक विलास कोंडीबा महाबळे यांचाही जबाब नोंदविण्यात आला. हा प्रकार गंभीर असल्याने अखेर तब्बल २४ दिवसांनी शिवाजीनगर पोलिसांनी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपण केल्याबद्दल तसेच सार्वजनिक संपत्तीची हानी केल्याबद्दल प्रतिबंधक अधिनियम 1995 च्या कलम 3 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन पार्टी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येईल, असे शिवाजीनगर पोलिसांनी कळविले आहे. दरम्यान माता गुजरीजी विसावा उद्यानात आता कुठलीही वाढदिवसाची पार्टी किंवा डब्बा पार्टी करता येणार नाही. उद्यानात येणाऱ्या प्रत्येकाची बॅग तपासण्यात येत असून, अशा प्रकाराला प्रतिबंध घालण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे.