गाझातील अन्नसंघर्ष संपणार; पुरवठा करण्यास अखेर इस्रायल तयार, मित्रराष्ट्रांच्या दबावानंतर निर्णय

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मित्र देशांच्या दबावानंतर गाझाला पुन्हा अन्नपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मार्चपासून इस्रायलने गाझामध्ये अन्नपदार्थांच्या प्रवेशावर बंदी घातली होती. त्यामुळे तेथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. नेतन्याहू म्हणाले की, आमच्या मित्रराष्ट्रांनी गाझावर ओढवलेल्या उपासमारीच्या संकटावरून चिंता व्यक्त केली. आम्ही ते सहन करू शकत नाही अशी भूमिका त्यांनी घेतली.

; अन्नधान्याच्या कमतरतेमुळे गाझामध्ये उपासमारीचा धोका वाढला आहे. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांकडून इस्रायलवर दबाव वाढत होता, त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी गाझा पट्टीत आवश्यक मदत पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

हमासला मदत नाहीच नेतन्याहू

गाझामधील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत असल्याने त्यांना मदत पाठवणे महत्त्वाचे आहे. पण ही मदत केवळ गरजू लोकांपर्यंत पोहोचेल, हमासपर्यंत नाही, असे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले. इस्रायल गाझामध्ये अन्न वाटप करण्यासाठी नवीन वितरण पेंद्रे बांधेल. ही सर्व पेंद्रे इस्रायली सैन्याच्या देखरेखेखाली असतील.

गाझामधील पाच पत्रकार ठार; हमासकडून निषेध

इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या तीव्र हवाई हल्ल्यात पाच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य ठार झाले. या हल्ल्यानंतर हमासने पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत संरक्षित असलेल्या पत्रकारांना इस्रायलकडून सतत लक्ष्य केले जात आहे, असे हमासने एका निवेदनात म्हटले. हमासवर दबाव आणण्याच्या इराद्याने इस्रायल निवासी भागात हल्ले करत असल्याने पॅलेस्टिनी नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.