सुनावणी तहकूब करण्याची विनंती गृहनिर्माण सोसायटीच्या अंगलट, हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

सुनावणी तहकूब करण्याची विनंती एका गृहनिर्माण सोसायटीच्या चांगलीच अंगलट आली आहे. न्यायालयाने या सोसायटीला 25 हजार रुपयांचा दंडच ठोठावला आहे.

सिमला हाऊस, असे या सोसायटीचे नाव आहे. वकील बदलला असल्याने सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती सोसायटीने केली. न्या. संदीप मारणे यांच्या एकल पीठाने यावर तीव्र संताप व्यक्त केला. सुनावणीच्या सुरुवातीलाच अशी विनंती करणे योग्य नाही. यासाठी सोसायटीला 25 हजारांचा दंड भरावा लागेल, असे आदेश देत न्यायालयाने ही सुनावणी 16 जून 2025 पर्यंत तहकूब केली.

गॅरेजच्या सदस्यत्वाचा वाद

या सोसायटीत गॅरेज आहे. ययाती वारीळे यांच्या वडिलांचे हे गॅरेज आहे. वडील सोसायटीचे नाममात्र सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर ययाती यांनी सदस्यत्वासाठी अर्ज केला. सोसायटीने सदस्यत्व नाकारले. ययाती यांनी निंबंधकांकडे दाद मागितली. निबंधकाने ययाती यांना सदस्यत्व देण्याचे आदेश सोसायटीला दिले. त्याविरोधात सोसायटीने याचिका दाखल केली आहे.

गॅरेज घराच्या व्याख्येत

गॅरेज हे घराच्या व्याख्येत येते, असे याच न्यायालयाने याआधी स्पष्ट केले आहे. याच मुद्दय़ावर ही याचिका फेटाळायला हवी. मात्र सोसायटीचे म्हणणे ऐकणे आवश्यक असल्याने ही सुनावणी तहकूब केली जात आहे, असे न्या. मारणे यांनी नमूद केले.