
पाकिस्तानी एजंट असल्याच्या संशयावरून आसाममधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला हिंदुस्थानातील संवेदनशील माहिती पुरवण्यात आल्याच्या संशयावरून आतापर्यंत तब्बल 73 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आसाममध्ये मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी ‘एक्स’वरून दिली.
आज चिरांग आणि होजाई येथून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हॅश टॅग करून आमचे मिशन राष्ट्रद्रोह्यांचा माग काढून त्यांना शिक्षा करणे हे आहे, असे सरमा यांनी म्हटले आहे. अलीकडेच आसाममधील विरोधी पक्षाचे आमदार अमिनल इस्लाम यांना पाकिस्तानची बाजू घेण्यावरून आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करण्यावरून अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती.
ज्योती मल्होत्राची चौकशी करणार एनआयए, आयबी
पाकिस्तानची हस्तक असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ‘यूटय़ूबर’ ज्योती मल्होत्राची एनआयए, आयबी आणि लष्करी गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी करण्यात येणार आहे. ज्योतीच्या बँक खात्यातील व्यवहार आणि प्रवासाबद्दलही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हल्ल्यापूर्वी तिने पहलगामला भेट दिली होती. त्यामुळे तिने दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगामची रेकी केली होती का? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.