
देशविदेशातील बोगस एमबीबीएससारख्या अभ्यासक्रमांपासून सावध राहण्याचा इशारा नॅशनल मेडिकल कौन्सिलने (एनएमसी) दिला आहे. हिंदुस्थानात अनेक बोगस वैद्यकीय महाविद्यालये असल्याचे एनएमसीच्या निदर्शनास आले आहे. या संस्था मान्यता मिळविल्याचा दावा करून बेकायदेशीररीत्या वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देऊन विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करत आहेत. म्हणून विद्यार्थी-पालकांनी संस्थेची वैधता पडताळून घ्यावी. एनएमसीच्या वेबसाइटवर मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांची यादी आहे. या यादीच्या आधारे विद्यार्थ्यांना हे तपासता येईल. तसेच एनएमसीच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधूनही माहिती घ्यावी, असे आवाहन एनएमसीने केले आहे.
कुठल्याही वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश थेट कॉलेजस्तरावर होत नाहीत. त्यामुळे वेबसाइट किंवा जाहिरातीच्या माध्यमातून प्रवेश घेण्याचा प्रकार फसवणुकीचा असू शकतो, असा इशारा एनएमसीने दिला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी +91-11-25367033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजस्थान, बंगालमधील कॉलेजेस स्पॅनरखाली
राजस्थानातील सिंघानिया विद्यापीठ आणि हावडामधील संजीबन कॉलेजनी मान्यता नसताना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक केली होती. त्यामुळे ही कॉलेजेस एनएमसीच्या स्पॅनरखाली आली होती. यापैकी एका कॉलेजवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
परदेशी संस्थांपासून सावध
परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांनाही सावध करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना काही निकषांची पूर्तता करावी लागते. यात विद्यार्थ्याने एकाच परदेशी संस्थेत किमान 54 महिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्याच विद्यापीठात 12 महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तसेच क्लिनिकल प्रशिक्षणही संस्था किंवा देशांमध्ये विभागलेले असता कामा नये आणि शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले पाहिजे. परंतु, अनेक परदेशी संस्थांमध्ये या नियमांची पूर्तता होत नाही.