
प्रसिद्ध कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना त्यांच्या ‘हार्ट लॅम्प’ या पुस्तकासाठी प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय ‘बुकर’ पुरस्कार मिळाला. ‘हार्ट लॅम्प’ हा मुश्ताक बानू यांच्या 12 लघुकथांचा संग्रह आहे. दीपा भस्ती यांनी तो इंग्रजीत अनुवाद केला आहे. बानू मुश्ताक आणि दीपा भस्ती यांनी मंगळवारी लंडनच्या टेट मॉर्डन गॅलरीत झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला. 50 हजार पाऊंड अशी पुरस्काराची रक्कम असून दोघींना ती विभागून देण्यात येईल.
बानू मुश्ताक यांचे ‘हार्ट लॅम्प’ पुस्तक ‘बुकर’ पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. जगभरातील इतर पाच पुस्तकांना मागे टाकत अखेर त्यांनी हा पुरस्कार जिंकला. पुस्तकात पितृसत्ताक समाजातील मुस्लिम महिलांच्या रोजच्या जगण्यातील आव्हाने मार्मिकपणे मांडण्यात आली आहेत. बानू मुश्ताक यांनी लघुकथा 1990 ते 2023 दरम्यान लिहिलेल्या आहेत. यातील 12 कथा निवडून दीपा भस्ती यांनी इंग्रजीत अनुवादित केल्या.
77 वर्षीय लेखिका, वकील अन् सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या बानू मुश्ताक यांनी आंतरराष्ट्रीय ‘बुकर’ पुरस्कार जिंकून इतिहास रचला. ‘बुकर’ पुरस्कार जिंकणाऱया बानू मुश्ताक पहिल्या कन्नड लेखिका ठरल्या. एखाद्या लघुकथासंग्रहाला मिळालेला हा पहिला ‘बुकर’ असून दीपा भस्ती या पुरस्कार जिंकणाऱया पहिल्या हिंदुस्थानी अनुवादक आहेत.
कोणतीही कहाणी छोटी किंवा मोठी नसते, या विचारातून या पुस्तकाचा जन्म झाला. मानवीय अनुभवाच्या ताना-बान्यात प्रत्येक धागा महत्त्वाचा असतो. ज्या जगात अनेकदा आपल्याला वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो, तिथे साहित्य अशी जागा आहे, जिथे आपण एकमेकांच्या मनात राहतो. काही पानांपुरतं का असेना… – बानू मुश्ताक