
>> स्पायडरमॅन
सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळे ट्रेंडस् येत असतात. कधी बकेट चॅलेंज, कधी दोन वाक्यांत भयकथा लिहिण्याचे चॅलेंज, कधी एखाद्या गाण्यावर हुबेहुब नृत्य करण्याचा ट्रेंड येतो, तर कधी वेगळे काही. यातले काही ट्रेंड हे प्रॅन्क अर्थात एखाद्याची थट्टा करणे या प्रकारात मोडणारे असतात. समोरच्या व्यक्तीची थट्टा करायची आणि त्यानंतर त्याची रिअॅक्शन लाइव्ह रेकॉर्ड करून ती इंटरनेटवर व्हिडीओच्या रूपात टाकायची असा हा प्रकार असतो. यात अनेक गमती जमती घडत असतात. मात्र असाच एक ट्रेंड फॉलो करणे स्वीडनच्या एका महिलेला चांगले महागात पडले असून कोर्टाने तिला दंडदेखील ठोठावला आहे.
स्वीडनच्या हेलिसंगबोर्हमध्ये राहणारी 24 वर्षांची एक महिला इंटरनेटवर चांगली सक्रिय होती. विविध ट्रेंडस् पाहता पाहता तिला आपणदेखील एग ब्रेक हा ट्रेंड फॉलो करावा, अशी फार इच्छा झाली. यामध्ये आईवडील आपल्या लहान मुलाच्या नकळत त्याच्या डोक्यात कच्चे अंडे पह्डतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पॅमेऱ्यात पैद करून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करतात. या महिलेने आपल्या मुलीला आपण अॅपल केक बनवू असे सांगत तिच्याशी बोलता बोलता अचानक लहानग्या मुलीच्या डोक्यात कच्चे अंडे पह्डले आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
तिच्या या व्हिडीओवर अनेक लोकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांना हा व्हिडीओ मजेशीर वाटला, तर काही लोकांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. लहानग्यांशी वागण्याचा हा योग्य प्रकार नाही असे मत त्यांनी नोंदवले. अशाच एका नाराज व्यक्तीने या महिलेच्या विरोधात स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि मामला कोर्टापर्यंत गेला. कोर्टानेदेखील महिलेच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आणि लहान मुलांना अशी वागणूक देणे चूक असल्याचे मत नोंदवत या महिलेला 20 हजार स्वीडिश क्रोनर म्हणजे जवळपास 1.07 लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला.