
>>देवेंद्र भगत
रहिवाशांच्या सुरक्षेसाठी पालिकेने कुर्ल्यातील मिठी नदीच्या संभाव्य पूरग्रस्त परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या नोटीस बजावूनही संबंधित पुटुंबांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे या 500 घरांना मिठी नदीच्या पुराचा धोका आहे. यातच पावसाळा तोंडावर आला असताना मिठी नदीचा अर्धा गाळ काढणे बाकी असल्याने पावसाळ्यात नदीचे पाणी नागरी वस्तीत शिरल्यास जबाबदार कोण, असा सवाल निर्माण झाला आहे.
मिठी नदी ही मुंबईची महत्त्वाची ओळख आहे. ही नदी स्वच्छ-सुंदर करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून काम करण्यात येत आहे. मात्र अजूनही ही नदी प्रदूषित असून अतिवृष्टीत नदीला पूर येण्याचे प्रकार घडतच आहेत. यातच नदीकिनारी कुर्ल्यासह मुंबईच्या अनेक भागांत मिठी नदीनिकारी मोठय़ा प्रमाणात वस्ती निर्माण झाली आहे. पालिकेने वारंवार नोटीस बजावून पिंवा कारवाई करूनही हे रहिवासी धोकादायक ठिकाणी राहत आहेत. त्यामुळे पालिका या घरांना नोटीस बजावून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी नोटीस बजावते. शिवाय अतिवृष्टीत दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार राहणार नाही, असेही नोटीसमधून सांगण्यात येते.
चार शाळांमध्ये सुविधा
पूरग्रस्त रहिवाशांना सुरक्षितस्थळी ठेवण्यासाठी पालिकेकडून कुर्ला विभागातच पालिकेच्या चार शाळांमध्ये सुविधा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना तात्पुरता निवारा, जेवण आणि स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या ‘एल’ विभागाकडून देण्यात आली.
गाळाचे प्रमाण
पावसाळ्याआधी मिठी नदीमधून 214315.49 मेट्रिक टन गाळ 31 मेपर्यंत काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र यातील फक्त 111390.15 मेट्रिक टन म्हणजेच केवळ 51.97 टक्केच गाळ काढण्यात आला आहे.
असे होतेय काम
z मिठी नदीतला गाळ तीन टप्प्यांत काढला जातो. यापैकी पवई फिल्टरपाडा ते कुर्ला सीएसटी पूल, बीकेसी कनेक्टर पूल ते माहीम कॉजवे आणि कुर्ला सीएसटी पूल ते कनेक्टर बीकेसी पूल अशा प्रकारे काम चालते.
z पहिल्या दोन टप्प्यातील कामाला 2 एप्रिलपासून सुरुवात झाली तर शिल्लक काम पावसाळ्यापूर्वी होईल, असे पालिकेने सांगितले.
आधी पुनर्वसन, नंतरच स्थलांतर करा! – संजय पोतनीस
मिठीचे सौंदर्यीकरण, रुंदीकरण आवश्यक आहेच, मात्र त्याआधी बाधित रहिवाशांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन झाले पाहिजे अन्यथा ते बेघर होतील, असे शिवसेना आमदार संजय पोतनीस म्हणाले.